30/06/2024
सीकेपी फूड फेस्ट - रेनी स्पेशल
पावसाळी भाज्यांचा भव्य खाद्यमहोत्सव
सर्व खवय्यांसाठी खुला - प्रवेश विनामूल्य
सहज किंवा हंगामानुसार उपलब्ध असणाऱ्या जिनसांमधून असामान्य चवदार पाककृतींचा आविष्कार म्हणजेच सीकेपी पाकसंस्कृती आणि ''असो मांसाहारी वा शाकाहारी - आम्हा सीकेप्यांच्या जेवणाची लज्जतच न्यारी'' या वाक्याला न्याय देणारा दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारा खाद्यमहोत्सव म्हणजेच सीकेपी फूड फेस्ट - रेनी स्पेशल अर्थात पावसाळ्यात येणाऱ्या आणि अस्सल सीकेपी पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या भाज्यांचा भव्य खाद्य सोहळा. फक्त मांसाहारीच नाही तर शाकाहारी जेवणातही तितकाच हातखंडा असणाऱ्या सीकेपी सुगरणी सज्ज असतात जून महिन्यात येणाऱ्या हिरव्यागार पावसाळी भाज्या अस्सल सीकेपी पद्धतीने बनवायला. अनेक भाज्या अशा आहेत ज्या फक्त पावसाच्या आगमनाबरोबरच येतात आणि काही दिवसच बाजारात उपलब्ध असतात. सध्या ऑरगॅनिक वगैरे जे काही बोललं जातंय त्याचा उत्तम नमुना म्हणजे या पावसाळी भाज्या. कुठलंही बी न पेरता, कुठलही खत न वापरता, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील रानावनातून मिळणाऱ्या निसर्गदत्त अशा या पावसाळी रानभाज्या खऱ्या अर्थाने आरोग्यदायी आणि अर्थातच अतिशय चवदार. सीकेपी पद्धतीने जेव्हा या भाज्या बनवल्या जातात तेव्हा यामध्ये सोडे, सुकट, खिमा या पदार्थांचा वापरही केला जातो. भारंगी, कोरळ, खारा माचवेल, साईचा मोर,कर्टुली, भुईफोड, कुडाच्या शेंगा, कुळू, टाकळा, शेवग्याचा पाला आणि पावसाळी भाज्यांची सम्राज्ञी म्हणजेच अस्सल सीकेपी पद्धतीने केलेली शेवळाची भाजी अशा अनेकविध भाज्या जेव्हा सीकेपी सुग्रणींच्या पाककौशल्यातून साकारतात तेव्हा त्यांचा आस्वाद घेणे हा एक स्वर्गीय अनुभव असतो. खूप मेहेनतीने शोधून, बाजारातून घरी आणून त्यावर अनेक पाक संस्कार करत या भाज्या जेव्हा शिजत असतात तेव्हा तळलेल्या सुरमाईचा पण विसर पडेल असा सुगंध सीकेपी घराघरांत दरवळत असतो.
हाच चवदार आणि आनंददायी असा एक अविस्मरणीय खाद्य अनुभव आपल्याला देण्यासाठी ''सीकेपी फूड फेस्ट - रेनी स्पेशल'' अर्थात सीकेपी पद्धतीने बनवलेल्या पावसाळी भाज्यांचा भव्य खाद्य सोहळा रविवार दि ७ जुलै रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळात ग्रँड समारोह बँक्वेट, सीकेपी हॉल, पहिला मजला, खारकर आळी, ठाणे (पश्चिम) येथे साकारणार आहे . या पावसाळी भाज्यांबरोबरच सीकेपी स्वयंपाकघरातील अनेक दर्जेदार खाद्यपदार्थ आपल्यासाठी उपलब्ध असतील तसेच सोडे, सुकट, सीकेपी व इतर मसाले, पापड, लोणची, आणि इतर अनेक खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतील. याबरोबरच फॅशन गारमेंट्स, परफ्यूम्स, केशर, फराळाचे पदार्थ, साड्या - ड्रेस मटेरियल इत्यादी अनेक स्टॉल्स देखील आपली उत्पादने आपल्यापर्यंत पोचवण्यास सज्ज असतील.
हा खाद्यसोहळा सर्व खवय्यांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे.
तर मंडळी, रविवार दि ७ जुलै २०२४ ही तारीख लक्षात ठेवा आणि त्या दिवशी थोडाफार पाऊस असला तरी या आगळ्यावेगळ्या खाद्यमहोत्सवाला "नक्की या !"
सीकेपी फूड फेस्ट - रेनी स्पेशल
पावसाळी भाज्यांचा भव्य खाद्य महोत्सव
रविवार दि ७ जुलै २०२४
सकाळी १० ते सायं. ९ पर्यंत.
ग्रँड समारोह बँक्वेट,
सीकेपी हॉल्स, पहिला मजला,
खारकर आळी, ठाणे (प)
"नक्की या !"