21/04/2017
सागरी किल्ले व बंदरांचा जिल्हा – सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्र राज्याच्या तळकोकणातील महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. या जिल्ह्याची स्थापना 1 मे 1981 रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनातून झाली. तेव्हा या जिल्ह्याचे नाव दक्षिण रत्नागिरी असे होते. कालातंराने नामांतर करुन सिंधुदुर्ग असे नाव ठेवण्यात आले. जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र, दक्षिणेला गोवा राज्य, पूर्वेला कोल्हापूर जिल्हा तर उत्तरेला रत्नागिरी जिल्हा आहे. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला नैसर्गिक सागरी किनारा लाभला असून या किनाऱ्यावर अनेक नैसर्गिक बंदरे आहेत. त्यामुळे या जिल्ह्यात रस्तेमार्ग व रेल्वेमार्ग वाहतुकीबरोबरच जलमार्गांचा विकास झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 121 किमी लांबीचा किनारा लाभला आहे. जिल्ह्यात आचरा, कोचरा, देवगड, मालवण, विजयदुर्ग, वेंगुर्ला, शिरोडा आणि सर्जेकोट अशी आठ महत्त्वपूर्ण बंदरे आहेत. देवगड तालुक्यातील पुरळ, मिठबांव, तारामुंबरी, मालवण तालुक्यातील आचरा, तारकर्ली, चिवला राजकोट व देवबाग त्याचप्रमाणे वेंगुर्ला तालुक्यातील निवती व भोगवे याठिकाणी समुद्र किनारे आहेत.
जिल्ह्यातील रस्तेवाहतुक ही अतिशय खडतर आहे. कोकणातील उंचसखल व दरी डोंगर अशा भूभागामुळे रस्त्यांचा फार विकास या जिल्ह्यात झाला नाही. दक्षिणोत्तर रस्ते वाहतूक त्यामानाने थोडीशी सुलभ आहे. पूर्वेकडील कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी घाटमार्गांचा वापर करावा लागतो. जिल्ह्यातून जाणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग (National Highway – NH17) या मार्गाला मुंबई-गोवा तसेच पनवेल-कन्याकुमारी (1622 किमी लांब) मार्ग म्हणून ओळखले जाते. हा मार्ग भारताच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला जोडतो. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याशी जोडणारा हा मार्ग आहे. मुंबई-गोवा-नागरकोविल या रेल्वेमार्गावरील सिंधुदुर्ग हे प्रमुख स्थानक आहे. याशिवाय वैभववाडी, कणकवली व सावंतवाडी जिल्ह्यातील सर्वात इतर रेल्वे स्थानके आहेत..
जिल्ह्यात शेती व मासेमारी हे प्रमुख व्यवसाय आहेत. त्याबद्दल जाणून घेण्याआधी जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या उद्योगाबद्दल माहिती पाहू या. सावंतवाडी येथे लाकडी खेळणी बनवण्याचा उद्योग चालतो. सावंतवाडीची लाकडी खेळणी जगभर प्रसिध्द आहेत. याशिवाय जिल्हा पर्यटन व्यवसायासाठी अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे. महाराष्ट्र राज्यातील पहिला संपूर्ण पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड 1999 मध्ये करण्यात आली. आचार खाडी (बेकवाटर), सिंधुदुर्ग किल्ला, तेरेखोल किल्ला, विजयदुर्ग किल्ला, कुडाळ येथील राऊळ महाराजांचा मठ, सावडाव येथील धबधबा, मालवणचे सुवर्ण गणपती मंदिर, देवगडचा किल्ला व दीपगृह, सावंतवाडी येथील राजवाडा, देवगडेचे कुणकेश्वर मंदिर, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण ही पर्यटनासाठी असणारी प्रसिध्द ठिकाणे आहेत.
आंबा, काजू व फणस ही नगदी पिके सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित होतात. देवगडचा पायरी आंबा युरोप अमेरिकेतसुध्दा प्रसिध्द आहे. इतर शेतकरी भात, नाचणी व अन्नधान्य पिकांचे उत्पादन घेतात. शेती व फळप्रक्रिया उद्योग इथे मोठ्या प्रमाणात विकसित केले जाऊ शकतात.
याशिवाय मासेमारी हा जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा व्यवसाय आहे. खाऱ्या व गोड्या पाण्यातील मासेमारी या जिल्ह्यात चालते. जिल्ह्यात देवगड, आचरा, तेरेखोल, गडनदी, शुक, कर्ली आणि तिल्लीरी या नद्या आहेत. नद्यांमध्ये गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते. मात्र हे प्रमाण कमी आहे. समुद्रकिनारपट्टीवर मासेमारी बंदरावर खाऱ्या पाण्यातील मासेमारी केली जाते.
ओरोस बुदुक्र हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणाला सिंधुदुर्गनगरी म्हणून सुध्दा ओळखले जाते. महाराष्ट्र सिंधुदुर्ग व रायगड हे केवळ दोन जिल्हे असे आहेत की त्यांची मुख्य ठिकाणे व जिल्ह्याचे नाव वेगवेगळे आहे. जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. सावंतवाडी, कणकवली, मालवण, देवगड, कुडाळ, वेंगुर्ला, वैभववाडी आणि दोडामार्ग ही या तालुक्यांची नावे आहेत. हा जिल्हा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात येतो. जिल्ह्यात एकही महानगरपालिका नाही. लिंग गुणोत्तरात दर 1000 हजार पुरुषामागे 1056 स्त्रिया असा सर्वात जास्त महिलांचे प्रमाण असणारा हा जिल्हा आहे.