08/12/2023
*नशिककर व्हायचं असेल तर.....*
खरेतर फक्त मुंबईकर, पुणेकर आणि नागपूरकर ह्यांचाच उल्लेख करून पु.लं. नी तसा आमच्यावर अन्यायच केला. कारण महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर ज्यांच्यापुढे कर जोडावे अशा जुन्या शहरात नाशिक खूपच सिनियर आहे. प्रभू श्रीरामचंद्रांची पर्णकुटी ज्या जागेवर होती असे मानले जाते, त्या जागेवर आज उभे असलेले काळाराम मंदिर याची साक्ष देते.
असो, तर तुम्हाला नाशिककर व्हायचं आहे का ?
व्हा ! नक्की व्हा !! पण त्यासाठी आधी नाशिकला नाशिक म्हणता आले पाहिजे. उगाच सदाशिव पेठी थाटात सानुनासिक 'नासिक' म्हणाल तर तुम्ही पहिल्या फेरीतच बाद व्हाल. तुम्हाला कामधंद्यानिमित्त लागलेली पुणेरी हवा लगेच ओळखू येईल.
खरा नाशिककर हा या शहराला "नाशिक" आणि गोदावरीला "गंगा" म्हणतो. हा अलिखित नियम आहे.
नाशिककर व्हायचं असेल तर सार्वजनिक ठिकाणी भाषण करताना "प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत..." हे वाक्य सुरुवातीलाच उच्चारले नाही तर तो फाऊल गणला जातो.
पूर्वेला टाकळीचा समर्थ स्थापित मारुती, पश्चिमेला त्र्यंबकेश्वर महादेव, उत्तरेला वणीची सप्तशृंगी देवी आणि दक्षिणेची कालिका माता असे भक्कम संरक्षण नाशिकला लाभले आहे.
खऱ्या नाशिककराला श्रीरामाबद्दल जेव्हढी आस्था आहे, तेवढी कुंभमेळ्याबद्दल नाही. आपण मुळात श्रीरामाचे अनुयायी असल्याने पाप केलेच नाही तर धुवायचे काय आणि कशाला, असा रोख सवाल ते विचारतात. घरच्या नळाला रामकुंडाचेच पाणी असते हा सार्थ विश्वास असल्याने 'आपण पुण्य पुरेसे कमावले असल्याने उगाच साधुलोकाना कशाला डिस्टर्ब करायचं' असा युक्तीवाद ते करतात.
नाशिकचं पाऊस पाणी तर विचारू नका ! दुतोंड्या मारुती हा गेली कित्येक वर्ष पाणी कुठवर आहे ? हे सांगण्यासाठी रामकुंडावर तिष्ठत उभा आहे असा समस्त नाशिककरांचा पूर्वीपासूनचा समज आहे. एकदा का त्याने यथेच्छ जलविहार केला कि पुढची ३ वर्षे पाण्याचे टेन्शन घ्यायचे नाही.
नाशिकचे सण उत्सव हे इतर शहराप्रमाणे असले तरी होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करून कॅलेंडरचा मान ठेवायचं काम भारतात फक्त नाशिककरच करतात,त्यात पुन्हा रहाडीत उडी मारली नसेल तर तुमची रंगपंचमी वाया गेली म्हणून समजा.
नाशिकची गंगा आणि तिच्या काठावरील घाट हा तर नाशिककरांसाठी अत्यंत आस्थेचा विषय आहे. स्विमिंग पूल यायच्या आधी समस्त नाशिककर पोहायला शिकले ते रामकुंडावर. चिमाजी अप्पांनी दिलेली घंटा आजही नारोशंकराची काकड आरती सुरू करते आणि त्या समोरच्या पटांगणावर वसंत व्याख्यानमाला रंगतात.
नाशिककरांची राजकीय विचारसरणी हा मोठ्या चर्चेचा विषय आहे. एकाच वेळी भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी साऱ्यांनाच आपला बालेकिल्ला नाशिक कसा काय वाटतो हे खुद्द नाशिककर सुद्धा सांगू शकत नाही. निवडून आलेल्या उमेदवाराला सुद्धा पुढच्या वेळी आपण राहू कि नाही हे शेवटपर्यत कोडे असते. त्यामुळे एकाचवेळी राजसाहेबांशिवाय पर्याय नाही" किंवा हेमंत गोडसे साहेबानींच खरा विकास केला" अशी दोन टोकाची वाक्ये इथे ऐकता येऊ शकते.
सांस्कृतिक क्षेत्रात मात्र नाशिकचा एक वेगळाच आब आहे.कुसुमाग्रज, सावरकर, दादासाहेब फाळके, वसंत कानेटकर अशा थोरामोठ्यांचे संस्कार झाल्याने "जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते" सारे आपल्यामुळेच, असा समज असणे सुद्धा नाशिककर असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे एखादे नाटक अथवा प्रयोग नाशिकमधे चालला की तो जगात कुठेही चालू शकतो. महाकवी कालिदासाचे नाव नाट्यगृहाला देणे यावरून नाशिककरांची प्रगल्भ दृष्टी दिसते.
खाण्याच्या बाबतीत मात्र नाशिककर कमालीचे चोखंदळ आहे. मिसळ हा पदार्थ आपली जहागीर असून दुसऱ्या शहरात मिसळीच्या नावाखाली फरसाण टाकलेली आमटी खपवली जाते हा त्यांचा शुद्ध आरोप असतो. कमला विजयची साबुदाना युक्त मिसळ, बुध्याची जिलबी, भगवंतरावची खुरचंद वडी, कोंडाजीचा कांदा आणि कोथिंबीर घातलेला गरम गरम चिवडा, पांडेची मिठाई, अशोक बेकरीची कणकेची बिस्किटे, सायंताराचा साबुदाणा वडा हे ज्याच्या घशाखाली उतरले नाहीत त्याने नाशिकच्या रहिवासी दाखल्यावरून आपले नाव कमी करावे.
कोणत्याही वरातीत नाचताना नाशिक ढोल किंवा कावडीच्या तालावर जो नागीण डान्स, कोंबडी डान्स, पोपट डान्स करू शकतॊ, तोच खरा नाशिककर.
तुम्ही भले कोणत्याही कॉलेजात शिकलेले असा. पण कॉलेजरोडला जर तुम्ही आपले तारुण्य घालविले असेल, तरच तुम्ही नाशिककर आहात म्हणून समजा.
नाशिककर हा इथल्या हवेसारखा थंड आणि आल्हाददायक स्वभावाचा आहे. तो मुंबईकरासारखी धावपळ करत नाही, पुणेकरांप्रमाणे किमान शब्दात कमाल अपमान करत नाही आणि नागपूरकरांसारखा अर्धवट मराठी-हिंदीत बोलत नाही.
तो त्याच्या धुंदीत शांततेत मस्त आयुष्य जगत असतो.त्यामुळे तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी "गड्या ! आपुला गाव बरा" म्हणायला विसरत नाही.
नाशिककर जेवढा परंपरावादी आहे, तेवढाच प्रगतिशील आहे.सुलाची द्राक्षे आणि तपोवनाची रुद्राक्षे अशा दोन्ही संस्कृती तो लीलया खांद्यावर पेलू शकतो. रामनवमीला ज्या भक्तिभावाने राम रथाच्या दोरीला हात लावतो, त्याच भक्तिभावाने तो श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घातल्यावर त्र्यंबकेश्वर महादेवाच्या पायरीवर माथा टेकतो.
तुकाराम मुंढे यांच्या सारख्या एखाद्या कर्तबगार अधिकाऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो, तर गोदावरी वाचवायला पण त्याच निर्धाराने उतरतो.
कदाचित ह्याच कारणामुळे वाल्मिकी रामायणापासून पेशवाईपर्यंत सर्वानीच ह्या शहराचे गोडवे गायले आहेत.
नाशिककर त्याच्या शहरावर अपार प्रेम करतो. सगळे जीवन उनाड वासरासारखं उंडारल्यावर आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला ह्याच गोदामाईच्या कुशीत रामकुंडात विसावा घ्यायचाय हीच त्याची इच्छा असते.
जर असं तुम्हालाही करता आलं तर तुम्ही नक्कीच नाशिककर व्हाल!!!!